आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सुमय्याला भेटा. म्हणजे, मला काही मिळाले नाही म्हणून रडत मरण्यापेक्षा जे मिळाले त्या बळावर आत्मविश्वासाने जीवन आनंदात कसं जगता येईल, याचा धडा मिळेल–महाराष्ट्र टाइम्स–१७.०९.2017

अगदी कालपरवाच सुखवस्तू घरातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचनात आली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सुमय्याला भेटा. म्हणजे, मला काही मिळाले नाही म्हणून रडत मरण्यापेक्षा जे मिळाले त्या बळावर आत्मविश्वासाने जीवन आनंदात कसं जगता येईल, याचा धडा मिळेल.

…..

अंध, मूक-बधिर, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रकारातील मुले बघितली की, आपल्या तोंडून सहज उद्गार निघतात, अरेरे! पण खरेच ही मुले अरेरे नव्हे; तर अरे व्वा! या कॅटिगिरीतली असतात याचा प्रत्यय सुमय्या परवीन अहमद शेख हिला भेटल्यानंतर येतो. धडधाटक असूनही रडत-कुढत जगणाऱ्यांसाठी सुमय्या म्हणजे प्रेरणावाटच!

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लाडखेडच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतून सुमय्या यावर्षी दहावी उत्तीर्ण झाली. स्वत: दिव्यांग असून कोणताही लेखनिक न घेता तिने ७३.८० टक्के गुण घेत मिळविलेले यश कौतुकास्पद ठरले. तिचे कौतुक करण्याकरिता जेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तिच्या घरी पोहचले तेव्हा सुमय्यासाठी जणू आकांक्षापुढती गगन ठेंगणे झाले.

सुमय्याची कहाणी नुसतीच प्रेरणादायी नाही तर आयुष्याला सतत टोकत राहणाऱ्या, नकारात्मक भावना घेऊन जगणाऱ्यांना सकारात्मकतेच्या मार्गाने नेणारी आहे. तिचे वडील अब्दुल अजीज अब्दुल लतीफ शेख दहावीपर्यंत शिकलेले. ते एका खासगी ट्रॅव्हल्सवर चालक आहेत. त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सुमय्याची आई अफरोज जहान अब्दुल अजीज सातवा वर्ग शिकलेली. सुमय्या पोटात होती तेव्हा या कुटुंबाने तिच्या आगमनाची जय्यत तयारी केली. एका तपासणीत डॉक्टरांनी अफरोज आणि अब्दुल अजीज यांना होणारे बाळ दिव्यांग असेल याची कल्पना दिली आणि हे दाम्पत्य क्षणभर विचलित झाले. लगेचच स्वत:ला सावरत त्यांनी अल्लाहच्या कृपेने जे होईल, जसे होईल त्याचा आम्ही स्वीकार करू, असा विश्वास डॉक्टरांना‍ दिला. २१ जुलै २००१ रोजी सुमय्याचा जन्म झाला त्या दिवशी मात्र या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण पूर्वी कल्पना असल्याने अब्दुल अजीज व अफरोज जहान पुन्हा सावरले. पूर्णत: अस्थिव्यंग स्वरूपात सुमय्याचा जन्म झाला आणि तिला जगविण्याची जबाबदारी आता आपली आहे असे मनाशी ठरवून त्यांचा संघर्ष सुरू झाला.

सुमय्या जन्माला आली ती जिवंत मांसाचा गोळा म्हणूनच. शरीराची हाडे वेडीवाकडी. हातापायांना केवळ पंजे. जन्माच्या सहाव्या दिवशीची सुमय्याला तपासणीसाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी अमेरिकेहून आलेल्या डॉक्टरांच्या चमूने सुमय्याची सर्व तपासणी करून तिची वाढ होणार नाही आणि यावर कोणते उपचारही नाही, असे सुमय्याच्या आई-वडिलांना सांगितले. सहा वर्षांपर्यंत सुमय्याला बसताही येत नव्हते. अमेरिकेच्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगूनही सुमय्याला पालकांनी अनेक ठिकाणी परत दाखविले. पण या अस्थिव्यंगावर उपचारच नसल्याचे त्यांना सर्वत्र सांगण्यात आले. घरात आलेला जीव जगवायची धडपडच नव्हे तर तिला उत्तम पद्धतीने‍ घडविण्यासाठी अब्दुल अजीज आणि अफरोज जहान यांचे प्रयत्न आजही सातत्याने सुरू आहेत. सुमय्याचे संपूर्ण शरीर गाठोड्यासारखे आहे. उंची एक ते दीड फुटांच्या आत. कुणीतरी उचलून घेतल्याशिवाय ती जागची हलूही शकत नाही. तिचे आई, वडील रोज मजुरीवर गेल्यानंतर या कठीण प्रसंगात सुमय्याची दादी रियासत बी तिची सारथी झाली आहे. गेली १७ वर्षे सुमय्याचा प्रवास आई, वडील आणि दादीच्या कडेवर सुरू आहे. सुमय्याला शाळेत सोडले की रिसायत बी यासुद्धा शाळा सुटेपर्यंत शाळेच्या आवारात बसून राहतात! पहिलीपासून आज सुमय्या अकरावीत गेली तरीही रियासत बींच्या या दिनक्रमात कधीही खंड पडला नाही.

सुमय्याची शिक्षणातील जिद्द बघून जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानातून तिला व्हीलचेअर, प्रवास आणि मदतनीस भत्ता देण्यात आला. चिमुरड्या सुमय्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. दहावीत कोणतीही शिकवणी न लावता व परीक्षेत कोणताही मदतनीस न घेता ७४ टक्के गुण घेऊन तिने आपल्या कृतीतून सुदृढ मुलांनाही मोलाचा सल्ला दिला आहे. अगदी कालपरवाच सुखवस्तू घरातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचनात आली. आणखी कुठेतरी वडिलांनी दप्तर घेऊन दिले नाही म्हणून नववीतील एका मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सुमय्याला भेटा. म्हणजे, मला काही मिळाले नाही म्हणून रडत मरण्यापेक्षा जे मिळाले त्या बळावर आत्मविश्वासाने जीवन आनंदात कसे जगता येईल, याचा धडा मिळेल.

केवळ अभ्यासातच नव्हे तर अवांतर कला प्रकारातही सुमय्या आघाडीवर असते. तिचा आवाज सुरेल आहे. शाळेत तिच्या प्रार्थनेनेच कार्यक्रमांची सुरुवात होते. गोड आवाजातील तिची प्रार्थना समोरच्याला भक्तीरसात तल्लीन करते. विकलांग, अपंग मुले नेहमीच इतरांच्या सहानुभूतीवर जगणारी असतात, असा सर्वमान्य समज. पण अशा मुलांमधील ‘सिक्स्थ सेन्स’ हा सामान्य मुलांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असतो. त्यामुळे ही मुले एकदा आत्मनिर्भर झाली की, त्यांना कुणाची सहानुभूती किंवा आधार लागत नाही, उलट तीच कुटुंबाचा, समाजाचा आधार होतात. सुमय्याला तर कुटुंब, समाजासोबतच देशाचा आधारस्तंभ व्हायचे आहे. तिने दहावीत मिळविलेल्या यशाचे कौतुक म्हणून तिचा सन्मान जाणीवपूर्वक तिच्याच शाळेतील विद्यार्थ्यांसमोर करण्यात आला. यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक सिंगला, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी या कौतुक सोहळ्याला खास उपस्थित राहून सुमय्याला शुभेच्छा दिल्या. जिद्द, चिकाटी, आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना प्रेरणा घेण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही, सुमय्याच्या रूपात अशी व्यक्तिमत्त्वे आपल्या अवतीभवतीच असतात, असे गौरवोद्गार यावेळी तिच्या सन्मानार्थ या अधिकाऱ्यांनी काढले. तेव्हा सुमय्या दिव्यांग असल्याचे माहीत झाल्यावर तिच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या तिच्या परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही. सुमय्याला भविष्यात प्रशासनात अधिकारी व्हायचे आहे. त्यादृष्टीने तिने आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा सुरू केली आहे. जीवनाकडे तुमचा बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती या बळावर काहीही शक्य आहे, अशी सुमय्याची ठाम भावना आहे. कदाचित हीच भावना तिला सतत प्रेरणा देत असेल.

दिव्यांगत्वाचे नाना पैलू आहेत. प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगांपुढे आभाळाएवढी आव्हाने! पण ही आव्हाने दिव्यांग मुले आपल्या क्षमतेप्रमाणे सहज परतूवन लावतात. दिव्यांगांची व्यक्तिगत आव्हानांपेक्षा कौटुंबिक व सामाजिक आव्हानांना सामारे जाताना प्रचंड दमछाक होते, हे वास्तव आहे. पण सुमय्यासारखी दिव्यांग जेव्हा, आम्हाला तुमच्या सहानुभूतीची कुबडी नकोय, आम्हाला सन्मानजनक सहकार्य हवंय. अरेरे!ची सांत्वना नको, तर अरे व्वा! अशी कौतुकाची थाप हवीय! हे आपल्या यशस्वी प्रयत्नांतून सिद्ध करते तेव्हा, आपण स्वत:तील उणिवांचा शोध घेत सुमय्यासारख्या दिव्यांगांपुढे आपोआपच नतमस्तक होतो!

via meet this girl before you think of suicide – article in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s