उद्याचं माध्यम – open window in Marathi, Maharashtra Times

उद्याचं माध्यम
निपुण धर्माधिकारी

ताजं माध्यम म्हणजे वेब! लोकांना आपण फोनमधून वर बघणं सक्तीचं करू शकत नाही. कितीही वाईट असलं तरी फोनमध्ये तर ते आता बघणारच आहेत. ते टाळणं अशक्य आहे. फक्त ते जे बघतील, ते काहीतरी चांगलं असेल याची काळजी घेतली पाहिजे!

काही काही लोकांनी विचारायला सुरुवात केली आहे की, आता चित्रपट दिग्दर्शन केल्यावर पुन्हा मागे फिरून नाटक करणार का? त्यावर ‘हो’ असं उत्तर दिल्यावर काहींना आश्चर्य वाटतं, काहींचा विश्वास बसत नाही आणि उरलेल्यांना वाटतं की फार आदर्शवादी उत्तर देतोय. थोडक्यात, कोणालाच खरं वाटत नाही. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांच्या प्रश्नामध्येच घोळ आहे. कारण चित्रपटानंतर नाटक करणं म्हणजे ‘मागे’ फिरणं नव्हे!

मला कथा सांगायला आवडतात. त्या मग प्रत्यक्षात भेटल्यावर मित्र-मैत्रिणींना हातवारे करत सांगणं असेल, फोनवर फक्त शब्दांच्या जोरावर सांगणं असेल किंवा नाटक-सिनेमातून सांगणं असेल. माध्यमं बदलतील, पण ‘कथा सांगणं’ हे मूळ बदलणार नाही. मग त्या गोष्टींकडे त्रयस्थपणे पाहिल्यावर साधारण अंदाज येतो की, ती कोणत्या माध्यमातून सांगितली पाहिजे. ती वेगवेगळी माध्यमं हाताळून पाहतोय. इकडे-तिकडे काहीतरी शोधत फिरतोय. ते सापडलं की स्थिरावेन. पण स्थिरावलो म्हणजे यशस्वी झालो का, हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यात आत्ता नको पडायला! असो… तर एकदा माध्यम ठरवलं की त्या कथेचा जीव ओळखून त्याची मांडणी सुरू होते. त्यामुळे काही उत्तम कथा या एकांकिका किंवा लघुपटातून जास्त प्रभावीपणे मांडता येतात. अट्टाहास म्हणून त्यांचं दोन अंकी नाटक किंवा चित्रपट बनवला की ‘गोष्ट ताणली’, ‘पाणी ओतलं’ अशा प्रकारची मतं वरचेवर ऐकू येतात!

त्यात सध्याचं नवीन, ताजं माध्यम म्हणजे वेब! ते उद्याचं माध्यम आहे, ज्याची सुरुवात काल झाली आहे. आज आपण अजून ते आजमावतोय, पडताळून पाहतोय. ते अजून पूर्णपणे हातात आलं नाहीये आणि ते येईल असं वाटतही नाहीये. आत्तापर्यंत जे आयुष्य जगत आले लोक त्या आयुष्याला सर्वसाधारणपणे एक रचना होती. काय केल्यानंतर काय होतं याचा एक अंदाज होता. बदल आणि बदलाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्थिरावण्यासाठीचा अवधी होता. काही गोष्टी स्थिरावल्यानंतर, त्याच्याबद्दल अंतरबाह्य माहिती असल्यावर त्यात प्रयोग होऊ शकतात. तसं होऊ लागलं. विविध देशातल्या कलाकृतींची सामान्य माणसांना माहिती नव्हती. त्या कलाकृती बघायची, अनुभवायची तशी सोयही नव्हती. चित्रपटांचे जे महोत्सव होत असतील तेवढेच. पण त्यांचंही प्रमाण कमीच! वेगळं नाटक बघायचं म्हणजे प्रवास करणं आलं आणि तेव्हा प्रवासही महाग. त्यामुळे आपल्या आजू-बाजूला जे घडतंय तेच बघण्याला पर्याय नव्हता. त्यात नव्वदीच्या दशकात केबल टी.व्ही. ने क्रांती घडवली आणि विविध कार्यक्रम लोकांच्या घरी आले. त्यामुळे बाहेर जाऊन, पैसे देऊन काहीतरी बघायची, अनुभवायची सवय हळू हळू सुटू लागली. अर्थात या सगळ्याला अपवाद होतेच.

पण जास्तीत जास्त लोकांना काय आवडतंय किंवा ते शिव्या घालत का होईना पण नित्यनियमाने काय बघतील याची टी.व्ही.मध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगली जाणीव होती आणि काहीच वर्षांत त्या माध्यमाचंही नावीन्य संपायला लागलं. जसजसा इंटरनेटचा प्रभाव वाढत गेला, यू-ट्यूब आणि स्मार्टफोनचा शोध लागला तसं मनोरंजन क्षेत्रातही बदल होऊ लागले. हे बदल हळूहळू मूलभूत गोष्टींमध्ये व्हायला लागले आहेत आणि आता एकंदरीत आपल्या कथा ऐकण्याचा, पाहण्याचा एकंदरीत अनुभवही बदलायला लागला आहे.

मी कुठेतरी वाचलं आहे की इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ हे यू-ट्यूब आहे. यामुळे त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं होतं. साहजिकच फेसबुक किंवा ट्विटर जास्त लोकप्रिय असतील असा एक अंदाज होता. पण विचार केल्यावर जाणवतं की माझा पण सर्वात जास्त वेळ हा यू-ट्यूबवर जातो. मी असंही कुठेतरी वाचलं आहे की यू-ट्यूबवर दररोज इतके व्हिडीओ टाकले जातात की जर एखाद्याने त्यातला प्रत्येक बघायचा ठरवला तर त्याची १० वर्षे खर्ची पडतील. हा रोजचा माल आहे! म्हणजे जन्मापासून बाकी काहीही न करता फक्त यू-ट्यूबवरचे व्हिडीओ बघायला घेतले तर मरेपर्यंत आपण यू-ट्यूबचे फक्त ७-८ दिवस जगलो असू! तर सांगायचा मुद्दा हा, की यावरच्या व्हिडिओन्ना असं काही structure नाही. पण प्रत्येकाला प्रेक्षक आहे! यामध्ये संपूर्ण चित्रपट, त्यांचे ट्रेलर, गाणी वगैरे आहेत, घरी साधा कॅमेरा वापरून तयार केलेले व्हिडीओ पण आहेत. पण त्याचबरोबर हे माध्यम सुरू झाल्यामुळे त्याचा कल्पकतेने वापर करणारी पण अनेक मंडळी आहेत! Vlog, vines, YouTube series, YouTube films चा उगम झाला आहे! ‘AIB’, ‘TVF’ ही नावं घरोघरी पोचली. या सगळ्याचं काही वर्षांपूर्वीपर्यंत नामोनिशाण नव्हतं, अस्तित्व पण नव्हतं! आपण काहीतरी लिहायचं मग निर्मात्याच्या चकरा मारायच्या, मग नशीब चांगलं असेल तर एकदा कलाकृती तयार झाली की मग पुन्हा त्याच्या प्रदर्शनाची टांगती तलवार. या माध्यमाने कलाकृती बनवणारा आणि प्रदर्शित करणारा यातली दरी मिटवली आहे. जितके जास्त लोक बघतील तितक्या जास्त जाहिराती त्या व्हिडीओला मिळतील आणि जितक्या जास्त जाहिराती आणि चॅनेलला सबस्क्रायबर तितके जास्त पैसे मिळण्याची शक्यता. शेवटी सगळं येऊन अर्थशास्त्रावर थांबतं. आणि आपण कसं जगायचं हे आपण विविध जाहिराती बघूनच ठरवतो असं माझं ठाम म्हणणं आहे. पण आत्ता तो विषय नाही. असो!

पण यू-ट्यूबमुळे अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे पूर्णपणे इंटरनेटचा वापर करून चॅनेल सुरू झालं. टी.व्ही.वर इतर चॅनेल असतात त्यापेक्षा बरेच वेगळे. आपल्या सोयीनुसार आपण त्यावरचे कार्यक्रम पाहू शकतो. म्हणजे ८.३० वाजले की अमुक-अमुक मालिका बघायलाच पाहिजे, असं अजिबात नाही. व्हिडीओ ऑन डिमांड. तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काय बघायचंय, कधी बघायचंय न् कुठे बघायचंय. कारण हे चॅनेल टीव्हीपासून, लॅपटॉप आणि फोनवर पण आलेत. आणि आता गेल्या काही वर्षांत अत्यंत दर्जेदार कलाकृतींची जबाबदारी पण त्यांनी उचलली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार ही त्याचीच उदाहरणं आहेत. चित्रपट आणि टीव्ही वरील निर्मातेही हळूहळू या माध्यमांकडे वळताना दिसतायेत. एकता कपूरने ‘ऑल्ट बालाजी’ सुरू केलं, इरॉसने ‘इरॉस नाऊ’.

पण अजून भारतात एक ‘TVF’ चा अपवाद वगळता कोणाला लक्षात राहील अशी दर्जेदार कथा सांगता आलेली नाही. मजा-मजा खूप लोक करतात. ‘भारतीय डिजिटल पार्टी’कडून आम्ही पण करतो. पण ते माध्यम फक्त कॉमेडीपुरतं नाहीये. त्यामध्ये भरपूर लोकांपर्यंत पोचण्याची ताकद आहे. आणि आता इंटरनेट स्वस्त झाल्यापासून तर या माध्यमाच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड भर पडलीये आणि ती फक्त वाढत जाणार आहे.

लोकांना आपण फोनमधून वर बघणं सक्तीचं करू शकत नाही. ते स्वतःसाठी कितीही वाईट असलं तरी फोनमध्ये तर ते आता बघणारच आहेत. ते टाळणं अशक्य आहे. फक्त ते जे बघतील, ते काहीतरी चांगलं असेल याची काळजी घेतली पाहिजे!

via उद्याचं माध्यम – open window in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s